पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू;
पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास,मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज कधी करणार दाखल?

0
134

पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – गेल्या दहा वर्षे मावळ लोकसभेचे खासदार असतानाही त्यांना मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. देशात कामगार कायदे बदलून त्यांना देशोधडीस लावले आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. यावरून प्रचारादरम्यान लोकांकडून प्रचंड चीड व्यक्त होते. मतदार माझ्या व महाविकास आघाडीच्या पाठिशी उभा राहणार असून आपला पावणेचार लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी बुधवारी (दि.17) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीतर्फे आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, महिला संघटीका अनिता तुतारे, सुशीला पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, प्रचारप्रमुख योगेश बाबर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, येत्या मंगळवारी (दि.23) मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यावेळी युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मावळ लोकसभेत प्रचार करताना महायुती सरकार आणि विद्यमान खासदारांबाबत प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीला सकारात्मक प्रतिसाद देत पाठींबा मिळत आहे. त्यामुळे तब्बल पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षात मावळ मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आला नाही. मतदारसंघात एमआयडीसीचा औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, कामगार कायदे बदलून त्यांना संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे व रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न भाग, गड, किल्ले, लेण्यांचा विकास करून पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. महागाई व बेरोजगारी त्यांना कमी करता आली नाही.

खासदारांकडून अहंकारातून उलटसुलट वक्तव्ये : संजोग वाघेरे
विद्यमान खासदार अहंकारातून उलटसुलट वक्तव्य करीत आहेत. ही निवडणूक नातेगोत्यांची नाही. महापुरूषांच्या फोटोची मला गरज नाही. मी बीडला जन्मलेला नाही, अशी बडबड ते करीत आहेत. त्यामुळे मी त्यांना विनम्रपणे रावणाप्रमाणे अहंकार चढला असल्याची टीका केली होती. वावगे काही बोललो, असे वाघेरे म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात योगदान दिले. मी आणि माझे वडिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर म्हणून काम केले. माझी पत्नी गेली पंधरा वर्षे नगरसेविका आहे. त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल माहिती नसेल, तर विद्यमान खासदारांचा अभ्यास कमी असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

मी भूमिका बदलणारा कार्यकर्ता नाही : संजोग वाघेरे
लोकसभा निवडणुकीनंतर मी माझी भूमिका बदलणार नाही. योग्य भुमिकेतून‌ लोकशाहीच्या वाचविण्याच्या विचारास ओढत मी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी श वचन दिले आहे. मी वाघेरे पाटील कुटुंबातून आलो आहे. मी सर्वसामान्यांसोबत जोडलेला कार्यकर्ता आहे. सर्व समाजातील घटक माझे भाऊबंद आहेत, असे संजोग वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरापेक्षा महागाई, बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे : मानव कांबळे
राम मंदिर, 370 कलम हे विषय सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचे नाहीत. महागाई, बेरोजगारी, महिला व अल्पसंख्याकांवरील वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मणिपूर येथील अमानुष्य अत्याचार या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या हितासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने आम्ही संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत आहोत, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली : कैलास कदम
कामगार कायदे बदलून कामगार वर्गच संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळवडे येथील आगीच्या दुर्घटनेत 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला. त्यांना सत्ताधारी भाजपने नुकसान भरपाई दिली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या भाजपच्या सभापतीला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ते जेलची हवा खावून आले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. भाजपा देश आणि संविधान विरोधी आहे. हे रोखण्यासाठी आम्ही संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी आहोत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.

हुकुमशाहीला नागरिक मतातून उत्तर देणार : चेतन बेंद्रे
ईडी आणि सीबीआयचा वापर करून भाजपाने देशभरात दबावतंत्र सुरू केले आहे. त्याचा वापर करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबले आहे. हुकुमशाही मोदी सरकारला नागरिक मतातून उत्तर देतील.
मावळ लोकसभेत महिला व आयटी विभागाची जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत, असे आपचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

मोदी सरकार विरुद्ध जनता अशीच निवडणूक : ज्योति निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही शहरात प्रचार करत आहोत. प्रचारात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. देशातील सरकार बदलाचा नारा सर्वत्र दिला जात आहे. मोदी सरकार विरोधी जनता अशीच ही निवडणूक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा ज्योति निंबाळकर म्हणाल्या.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात आणखी आघाडी घेणार: योगेश बाबर
महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन केले आहे. सर्वांना जबाबदार्‍या विभागून देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा जोर आणखी वाढेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे बारामती लोकसभेच्या बैठकीस गेल्याने ते आले नाहीत, असे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here